पितृपक्ष कथीत - भाग 1, भाग 2 आणि भाग 3 : सोप्या आणि बोली भाषेत
पितृपक्ष भाग १ ,भाग २, भाग ३ ( सोप्या आणि बोली भाषेत )
सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन पितृपक्ष या विषयी थोडी माहिती जाणून घेऊ.. श्रध्देने जे केले जाते त्याला श्राध्द अशी संज्ञा शास्त्रकारांनी दिली आहे.
मृतव्यक्तींच्या उद्देशाने प्रतिवर्षी जे करतो त्याला सांवत्सरीक श्राध्द अशी संज्ञा आहे. पितृपक्षात जे श्राध्द करतात त्याला महालय श्राध्द अशी संज्ञा आहे.
आपले आकाश हे 360अंश कल्पलेले असुन सूर्य हा सहाव्या राशीत म्हणजे "कन्या "राशीत गेल्यानंतर तो वृश्चिक राशीत जाण्यापर्यंतचा काऴ जो जवऴपास दोन महीने असतो तो पर्यंत महालय श्राध्द करता येते.
भाद्रपद कृ.1 ते भाद्रपद अमावास्या या कृष्णपक्षात महालय श्राध्द रोज करावे असे वचन आहे. सांप्रत सलग 15 दिवस श्राध्द करणे हे व्यावहारीक दृष्ट्या थोडे कठिण असल्याने वडिलांच्या निधन तिथीस किंवा अमावास्येला महालय श्राध्द एकदाच केले जाते. हा ही पक्ष मान्य आहे.
सांवत्सरीक श्राध्दात त्रयीलाच उद्देशुन पिंडदान केले जाते (आई आजी पणजी किंवा वडिल आजोबा पणजोबा) परंतु महालय श्राध्दात सर्व नातेवाईकांना पिंडदान केले जाते.
पितृत्रयी - वडिल आजोबा पणजोबा
मातृत्रयी - आई आजी पणजी
मातामहत्रयी - आईचे वडिल आजोबा पणजोबा
मातामहित्रयी - आईची आई आजी पणजी
सापत्न मातु - सावत्र आई
पत्नी - पत्नी निवर्तली असेल तर
पुत्र - उपनयन झालेला पुत्र गेला असेल तर
दुहिता - विवाहित कन्या निवर्तली असेल तर
पितृव्य - सख्खे काका (काकू गेली असेल तर सपत्नीक असा उल्लेख करावा. चुलत भाऊ गेला असेल तर ससूत असा सोबत उल्लेख करावा)
मातुल - सख्खा मामा (मामी गेली असेल तर सपत्नीक व मामेभाऊ गेला असेल तर ससूत असा उल्लेख करावा)
भ्रातु - सख्खा भाऊ (भावजय गेली असेल तर सपत्नीक असा उल्लेख करावा)
पितृभगिनी - सख्खी आत्ये (आत्येचे यजमान गेले असतील तर सभर्तृ असा उल्लेख करावा व आत्येभाऊ गेला असेल तर ससूत असे म्हणावे)
मातृभगिनी - सख्खी मावशी (यजमान गेले असतील तर सभर्तृ व मावसभाऊ गेला असेल तर ससूत असा उल्लेख करावा)
आत्मभगिनी - सख्खी बहिण (तीचे यजमानहि निवर्तले असतील तर सभर्तृ असे संबोधावे)
श्वशुर - सासरे (सासूबाई निवर्तल्या असतील तर सपत्नीक असे म्हणावे)
गुरु - ज्यांनी गायत्री उपदेश केला ते (वडिलांनी मुंज लावली असेल तर वडिल) अन्य कोणी मुंज लावली असेल तर ते गुरु.
आचार्यगुरु - ज्यांनी विद्या व शिक्षण दिले,मोक्षगुरु
शिष्य - आपला विद्यार्थी
आप्त - वरील नावांमध्ये ज्यांचा उल्लेख नाहि परंतु ज्यांचे आपल्याशी आपुलकीचे संबध होते व ज्यांचे आपल्यावर उपकार आहेत या सर्वांना आप्त या संज्ञेत पिंडदान करु शकतो.
सर्व मृत नातेवाईंकांची नाव व गोत्रासहित एका वहीत नोंद ठेवावी व पुरोहीतांच्या सल्यानुसार वरील प्रमाणे सुसुत्रीत यादी बनवावी.
या शिवाय चार धर्मपिंडांची योजना महालयात केली आहे.
मित्र, सखा, पशू, वृक्ष, जाणतेपणी अजाणतेपणी ज्यांनी आपल्यावर उपकार केले त्यांचाकरता जे आपल्याकडे आश्रीत होते त्यांचा करता ही धर्मपिंड आहे.
मातृवंशात, पितृवंशात गुरुंच्या वंशात किंवा आप्तबांधवात ज्यांना संतती नसल्याने पिंडदान होत नाहिये त्यांच्या करता ज्यांचे क्रियाकर्म झाले नाही. जे जन्मताच अंध, पंगु जन्मले त्यांचा करता व विरुपांकरता ही धर्मपिंड आहे.
जे कुंभीपाक नामक नरकात पाप कर्मापुऴे खितपत पडले आहेत त्यांचाकरताहि धर्मपिंड आहे.
असे चार धर्मपिंड महालयात दिले जातात.
महालय श्राध्द किती प्रकारात करता येईल ? कारण अनेक श्रध्दावान आस्तीक असतात परंतु नोकरीमुळे किंवा धावपळीमुऴे त्यांना काही वेळा थोड कठिण होतं त्यांच्या करता..
१ - दोन किंवा पाच ब्राह्मण, किंवा चटावर दर्भबटू ब्राह्मण योजना करुन श्राध्दस्वयंपाक करुन सपिंडक महालय करणे शक्य आहे.
२ - आमान्न म्हणजे शिधा सामग्री योजना करुन आमश्राध्द करणे शक्य आहे.
३ - दूध, केऴ, अल्पोपहार यांची योजना करुन हिरण्यश्राध्द यात पिंडदान नसते.
४ - ब्रह्मार्पण - दोन, पाच ब्राह्मण व सवाष्ण कोणी गेली असेल तर सवाष्ण (सुवासिनी) पूजन करुन अन्नसंतर्पण यात पिंडदान नसते.
५ - एखाद्याची आर्थिक स्थिती नसेल किंवा मनुष्यबऴ वयोमानानुसार कमी असेल तर "शमीपत्रा "ऐवढा पिंड दिलेला ही शास्त्रा मध्ये संमत आहे. शमीपत्र हे भाताच्या शिता ऐवढेच असते.
यातील काहीच जमत नसल्यास घोर वनात जाऊन दक्षिणेकडे तोंड करुन उभे राहुन आपल्या दोन्ही काखा वर करुन माझी आर्थिक स्थिती नसल्याने मी पिंडदान किंवा पितरांचे श्राध्द करु शकत नाही या बद्दल क्षमा याचना करुन पितरांचे स्मरण केले तरी श्राध्द पुर्ण होते.
श्राध्दात विकिर व प्रकीर असे दोन भाग दिले जातात .
अग्निदाह झालेले किंवा अग्निदग्ध न झालेले गर्भस्त्रावात मृत झालेले ज्यांना रुप ही प्राप्त न झालेले या सर्वांना ही एक भाग श्राध्दात महालयात दिला जातो.
ज्या देवतांना सोमभाग मिऴत नाही त्यांनाही एक भाग श्राध्दात दिला जातो.
रामचंद्रानी वनात असताना दशरथ राजाला कंदमुळाचे पिंड दिले होते असाही उल्लेख रामायणात आहे.
कन्याराशीत सूर्य गेल्यावर तुळ राशीत सूर्य असेपर्यंत तो पृथ्वीच्या बराच जवऴ असतो. पितृगणांकरता दिलेले कव्य (अन्न भाग) हा सर्वप्रथम सूर्यमंडलात जातो तेथून तो चंद्रमंडलात जातो. चंद्रमंडल हे स्वयंप्रकाशीत नसुन सूर्यनारायणांची सुषुम्ना नाडी या चंद्र मंडलाला प्रकाशीत करते दर महिन्याच्या अमावास्येला चंद्रमंडल व सूर्यमंडल एकत्र येत असते त्यामुळे अमावास्येला पितरांना दिलेले अन्न अधीक जलद गतीने त्यांना प्राप्त होते.
कन्याराशीच्या 10 अंशापासून ते तुळ राशीच्या 10 अंशापर्यंतच काळात सूर्य व पृथ्वी या दरम्यानच्या अंतर सर्वात कमी असते त्यामुऴे पितरांना दिलेला कव्यभाग (अन्न) पितरांपर्यंत लवकर पोचते.
श्राध्द हि व्यवस्था मनीऑर्डर प्रमाणे जाणावी. उदा. मी वसमत् पोस्ट ऑफीस मधे 500 रु.अेक नोट मुंबईला भावाकडे पाठवली तर माझ्या भावाला मुंबईत तीच नोट मिऴेल का ? नाही ना..त्याला त्या पोस्टात उपलब्ध असलेले पाचशे रु.मुल्याचे चलन मिऴेल (100 च्या पाच नोटा मिऴतील किंवा 50 च्या दहा नोटा मिऴतील) पण चलन तेवढेच मिळेल तद्वत आपण जे अन्न पितरांच्या उद्देशाने देतो त्याच वेऴी तेवढच अन्न मिळेल.
आपल्या पुर्वजांनी ज्या योनीत जन्म घेतला असेल त्या योनीला आवश्यक जो आहार असेल त्या रुपाने मिळते.
आता श्राध्दात पित्र खरेच जेवतात का ? हा हल्लीचा फार मोठा प्रश्न आहे.
आपण जेव्हा श्राध्दान्न जेवतो तेव्हा ते किती ही अल्प जेवले तरी शरीराला एक प्रकारची सुस्ती व जडपणा अनुभवता येतो. परंतु एखाद्या यज्ञ किंवा मंदिरात कितीही भरपेट प्रसाद घेतला तरी सुस्ती जडपणा जाणवत नाही मंदिरातील प्रसादात कांदालसूण, गरममसाले वगैरे काही नसलं तरी तो चवीला सुमधुरच लागतो कारण, त्या अन्नावर भगवंताची कृपा असते व श्राध्दान्नावर पितरांची "आसक्ती "असते. त्यामुळे शरीराला जडत्व येतं. एरवी खीर वडे खाल्ले तर सुस्ती येत नाही.
हा अनुभव घ्यायला हरकत नसावी की.. स्वयंपाक हा घरीच केलेला असावा. भरपुर प्रकार केले नाहीत तरी चालेल परंतु सात्विक पणे आपल्या पूर्वजांना आपल्या हातचे दिलेले अन्न हे अधीक प्रिय असते. त्यातली आपुलकी व कृतज्ञता हॉटेल किंवा कँटरींगच्या अन्नाला कधीच येणार नाही. सूनांनी, लेकींनी केलेला वरणभात हा आई वडिलांना पंचपक्वानांपेक्षा अधीक प्रिय असतो हे सदैव ध्यानात ठेवावे.
पितृपक्षात आपल्या पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त करुन त्यांना संतुष्ट करुन त्यांचे आशीर्वाद घ्यावेत.
वरील माहीतीत काही न्युन असेल तर क्षमस्व
पितृपक्ष_भाग_2
सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन महालय श्राध्द विषयासंबधीचा पुढील माहिती आज आपण पाहुया श्राध्दकाल व श्राध्दभूमी या बद्दल माहीती जाणून घेऊ. तसच श्राध्द व महालयात कोणते भोजन पदार्थ करावेत व कोणते वर्ज्य करावेत तेही पाहू.
देवकार्याणि पुर्वाण्हे मनुष्याणां तु मध्यमे । पितृृणामपराण्हे तु कार्याण्येतानि यत्नत:।। दक्षस्मृति 2 अ.श्लो.26.
देवकार्य पूर्वाण्हात, मनुष्यकार्ये म्हणजे अतिथीयज्ञादि दिवसाच्या मध्यभागात व पितरांचा उद्देशाने करणारी कर्मे अपराण्हकाऴात प्रयत्नपूर्वक केली पाहिजेत.
दिवसस्याष्टमे भागे मन्दीभवति भास्कर:। स काल: कुतपो नाम पितृणां दत्तमक्षयम्।। वासिष्ठस्मृति अ.11श्लोक 33.
दिवसाच्या आठव्या भागात सूर्याचे तेज मंद होते याला कुतप काल म्हणतात. यावेऴी जर श्राध्द केले तर पितरांची अक्षय्य तृप्ति होते.
देवलस्मृतित तर एकोदिष्ट हे मध्यान्हकाली व वृध्दिश्राध्द प्रात:काली करावे असे दिले आहे.
लघुहारीतस्मृतित पण असे म्हटले आहे की पंडित लोक 8 मुहुर्ताला (कुतप काली) श्राध्द करतात. प्रजापतिस्मृति मधे असा उल्लेख आहे जर वार्षिक श्राध्दाची तिथी दोन दिवस असेल तर ज्या दिवशी ती कुतप कालात मिऴत असेल त्या दिवशी श्राध्द करावे. कुतप काऴ म्हणजे अपराण्ह काळ श्राध्द व महालया करता हा प्रशस्त मानला आहे. हा काऴ कसा पाहायचा ते सांगतो सूर्योदय ते सूर्यास्त या काऴास दिनमान म्हटले आहे. या दिनमानाचे समान पाच भाग करावे त्यातील चौथा भाग हा अपराण्ह काऴ असतो.
आता श्राध्दाकरता पवित्र देश पाहू.
अवकाशेषु चोक्षेषु नदीतीेरेषु चैव हि । विविक्तेषु च तुष्यन्ति दत्तेन पितर: सदा।। मनुस्मृति 3 अ.श्लो.207
स्वाभाविक पवित्र वनादि देशात नदीकिनारी, एकान्तात श्राध्द केल्याने पितर संतुष्ट होतात.
यद्ददाति गयास्थश्च सर्वमानन्त्यमश्नुते ।। याज्ञवल्क्यस्मृति 1 अ.श्लो.261
गयातीर्थावर श्राध्द केल्याने पितरांची अनंत कालापर्यंत तृप्ति होते. शंखस्मृति 14 अध्यायात काही अधिक स्थाने दिली आहेत ती पाहू.
यद्ददाति गयास्थश्च प्रभासे पुष्करे तथा । प्रयागे नैमिषारण्ये सर्वमानन्त्यमश्नुते ।।27।।
गंगायमुनयोस्तीरे पयोष्ण्यमरकण्टके । नर्मदायां गयातीरे सर्वमानन्त्यमश्नुते ।।28।।
वाराणस्यां कुरुक्षेत्रे भृगुतुङ्गे महालये । सप्तवेण्यृषिकूपे च तदप्यक्षयमुच्यते ।।29।।
गंगा प्रभास, पुष्कर, प्रयाग, नैमिषारण्य, अमरकंटक, काशी, कुरुक्षेत्र, भृगुतुंग तीर्थावर तसेच महालय पक्षात गंगा यमुना पयोष्णी नर्मदा सप्तवेणी, आणी ऋषिकूपाचा तीरावर जे श्राध्द केले जाते त्याचे फऴ हे अक्षय्य असते.
प्रजापतिस्मृती मधे काही अधिक माहिती दिली आहे ती पाहू.
सरित्समुद्रतोयैक्ये वापीकूपसरित्तटे। देवजुष्टे च संप्राप्ते देशे श्राध्दे गृहान्तरे।।
धात्रीबिल्ववटाश्वत्थमुनिचैत्यगजान्विना। श्राध्दं छायासु कर्तव्यं प्रासादाद्रौ महावने।। श्लोक.53-54
नदी व समुद्राचा संगम होतो तेथे, विहिर, तळी, नदीतीरी, देवमंदिरात, श्राध्ददेशात, घरामधे, बेल, वड, पिंपऴ, अगस्त्य अथवा प्रसिध्द वृक्षांचा छायेत पर्वत अथवा महावनात किंवा प्रासादात श्राध्द करावे.
ऐखाद्या व्यक्तीच्या घरात जागेचा अभाव असतो परंतु श्राध्दपक्ष करण्याची मनात भावना असते तेव्हा शास्त्रकारांनी हे पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत.
श्राध्दाचा स्वयंपाक करताना कोणत्या पदार्थांचा वापर करु नये व कोणते पदार्थ करावेत हे ही स्मृतिग्रंथात दिलय. तेही आपण पाहु..
म्हशीचे दुध, हरभरे चणे, कोहऴा, लाल भोपऴा, मसूर कांदा लसूण, वांगी, ओवा, पडवऴ, हिंग, गाजर,कोथिंबीर, ओवा, चारोऴी हे पदार्थ वर्ज्य करावेत.
खीर, दही यांच्या करता गायीचे दुध उत्तम, उडिद डाऴ, मूग, गहू तळलेले पदार्थ वडे पूरी वगैरे , मध हे पितरांना अधीक प्रिय आहेत. (अगोधूमं यच्छ्राध्दं, माष मुद्ग विवर्जितं तैल पक्वान रहितं कृतमपि अकृतं भवेत्) वरील पदार्थ श्राध्द भोजन न योजल्यास ते श्राध्द केले तरी न केल्याप्रमाणेच होईल. दुर्गंध व केशयुक्त पाणी टाऴावे शिळे पाणी देखील श्राध्द स्वयंपाकास वर्ज्य आहे.
श्राध्द कर्त्याने व भोजन कर्त्यांनी काही नियम जाणावेत..
श्राध्द दिन व तत्पूर्वदिनी स्त्रीसंग वर्ज्य करावा. दुसर्यांद्या भोजन करु नये. सकाऴी क्षौर (दाढि केस) करु नयेत, मोठ्या आवाजात बोलु नये जोरजोरात हसु नये, गऴ्यात माऴा अलंकार घालु नयेत. दिवसा झोपू नये अतिथीस श्राध्दापूर्वी भोजन वाढु नये. मक्तकेशा म्हणजे केस सोडुन स्वयंपाक करु नये किंवा वाढु ही नये. सकच्छ (कासोटा युक्त नववार साडी) मधे ही स्वयंपाक करण्यास व वाढण्यास प्रशस्त आहे. हॉटेल किंवा कँटरर चा स्वयंपाक श्राध्दाकरता योजु नये. (स्वयंपाक या शब्दात स्वयम् म्हणजे स्वत:कुटुंबियांनी केलेले अन्न अभिप्रेत आहे) त्यात सात्विकता व आपुलकी असते तीच पितरांना प्रिय आहे.
वरील माहितीत काही चुका आढऴल्या तर खाली कमेंट करून त्या निर्दशनास आणाव्यात. यासंबधी अधिक माहिती आपण उद्या पाहूच..आर्यसनातन हिंदू धर्माचे हेच वैशिष्ट आहे की जवऴपास 60 पेक्षा अधिक स्मृतिग्रंथ आपल्या मार्गदर्शनाकरता ऋषिमुनींनी रचले आहेत. श्राध्दा करता एवढे पर्याय (श्राध्दाचे प्रकार, स्थल, काल, अन्न,) यावर विपूल लेखन या मंडऴींनी केले आहे. आता, आपण श्राध्दाकरता घरात जागा नाही असे सांगणार्यांना हे ऐवढे पर्याय देऊ शकता. जो खरोखर आस्तीक धर्मप्रेमी आहे तो याने नक्किच संतुष्ट होईल व नक्की आपल्या पूर्वजांचे श्राध्द करुन त्यांचे आशीर्वाद प्राप्त करेल यात संशय नाही.
वरील माहितीत जे काही चांगले आहे ते माझ्या गुरुंचे.. वाईट असेल ते माझे...
पितृपक्ष_भाग_3
सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन श्राध्द किंवा महालय या विषयात उद्भवणारे प्रश्न व निर्माण केले जाणारे संभ्रम या विषयी आज मत मांडतोय.
सर्वप्रथम लेख वाचताना व चिंतन करताना प्रत्येक गोष्ट ही "वैज्ञानीक सिध्द "किंवा पाश्चात्य सिध्द हवी हा आग्रह धरु नये ही विनंती. सर्वच गोष्टि मानवी डोऴ्यांना (चर्मचक्षुंना) दिसत नाहीत.त्यांचा अनुभव घ्यावा लागतो व ज्या ऋषिमुनींना व संतमहात्म्यांना अनुभवता आल्या त्यांचा अनुभवसिध्द मार्गाने जाणे हे श्रेयस्कर ठरते.
आपल्या दैनंदिन जीवनात देखील आपण जुन्या जाणत्यांना आलेल्या बोधावरुन किंवा त्यांच्या मार्गदर्शनाने जात असतो व आपल्या चुका टाऴत असतो..
"चक्षुर्वै सत्यं " जे डोऴ्यांना दिसते तेच सत्य मानणे हाच विज्ञानवाद असेल तर मग "मन "हे कोणत्या एक्सरे, सिटिस्कँन, अेम.आर.आय.किंवा अन्य तपासण्यांतुन आपल्याला दिसत का ? आणि जर ते प्रत्यक्ष डोऴ्यांना दिसत नसेल तर मग मन आहे हे कसे सिध्द होईल ? व जो पर्यंत हे सिध्द होत नाही तो पर्यंत मग मानसोपचार तज्ज्ञ हि वैज्ञानीक शाखा व त्याद्वारे होणारे उपचार हे रोग्याच्या जीवनाशी खेऴ होत नाहीत का?
ही प्रस्तावना करण्यामागे हेतु हाच आहे की विज्ञान देखील "गृहितकांवर "चालते.
श्राध्द या विधिचा पाया हा आत्मा अमर आहे व त्याला विविध योनींमध्ये जन्म घेऊन आत्मोन्नत्ति करुन मोक्षाकडे जाणे या मुख्य सुत्रावर आधारीत आहे.
भगवद्गीतेत स्पष्टपणे म्हटलय..
वासांसी जीर्णानी यथा विहाय。या श्लोकात जसे जीर्ण झालेले वस्त्र मानव टाकुन देतो व नवीन वस्त्र धारण करतो त्याच प्रमाणे आत्मा हे जीर्ण शरीर टाकुन नवीन शरीर धारण करतो. हा नियम सर्वसामान्यांकरता जाणावा संत तपस्वी योगी हे स्वत: ठरवुन जन्म घेतात व स्वेच्छेनेच देहत्याग करतात.
नैनं छिन्दन्ति शस्त्राणी 。या श्लोकात तर स्पष्ट म्हटलय आत्म्याला कोणतेही शस्त्र मारु शकत नाही अग्नि जाऴु शकत नाही वारा उडवु शकत नाही व पाणी हे आत्म्याला भिजवु शकत नाही असे दिलय.
एखादा म्हणेल हे सिध्द करा. तर या करता एक दृष्टांत रुपक कथा आहे ती सांगतो.
गोपालकृष्णांचे बालवयातील पराक्रम व कीर्ती ऐकुन एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण काशीतुन भगवंताच्या भेटिला आला व (आत्मा अमर असतो हे उपनिषद प्रतिपाद्य वचन नीट समजवुन घेवु ही त्याची कामना होती) गोकुऴात आल्यावर नंद महाराजांनी त्यांचे स्वागत केले.
कृष्णाने त्यांना प्रश्न केला हे भूदेवा आपण कोठुन आलात ?
ब्राह्मण - काशी नगरातुन
कृष्ण - काशीत कोठुन आलात ?
ब्राह्मण - मातेच्या गर्भातुन जन्म काशीतच झाला
कृष्ण - माते कडे कोठुन आलात ?
ब्राह्मण - पित्याकडुन
कृष्ण - पित्याकडे कोठुन आलात ?
ब्राह्मण - त्यांचा अन्नातुन (वीर्य किंवा तेज हे अन्नापासुन बनते) म्हणजे भाकरीतुन समजा
कृष्ण - मग जेव्हा तुम्ही ज्वारीच बीज होता व गरम जमिनीत तुम्हाला पेरल तेव्हा चटका बसला होता का ?
ब्राह्मण - नाही.
कृष्ण - पाउस पडल्यावर तुम्ही भिजला होता का ?
ब्राह्मण - नाही .
कृष्ण - मग पिक चांगल पिकल तेव्हा तुम्हाला विळ्याने कापल तेव्हा रक्त आले होते का ?
ब्राह्मण - नाही.
कृष्ण - मग बैलांच्या पायाखाली "मळणी " करताना, दाणे काढताना काही लागल होत का ? किंवा पिकाला वार लावतात त्यावेऴी तुम्ही उडुन गेला होता का ?
ब्राह्मण - नाही.
कृष्ण - जात्यात दळले तेव्हा काहि दुखापत. किंवा गरम पाणी घालुन पीठ भिजवले तेव्हा तुम्हि ओले झालात का ?
ब्राह्मण - अजीबात नाही
कृष्ण - गरम तव्यावर भाकरी भाजताना तुम्हाला चटके बसले होते का ?
ब्राह्मण - नाहीच
मग कृष्णाने विचारले याचे कारण काय ? ब्राह्मण म्हणाला "देवा तुम्हीच सांगा "
तेव्हा भगवंत म्हणतात..
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावक:।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुत:।। (भगवद्गीता 2.23)
अच्छेद्यो ऽयम दाह्यो ऽयम क्लेद्यो शोष्य अेव च।
नित्य: सर्वगत:स्थाणु रचलोऽयं सनातन:।।
(भगवद्गीता 2.24)
हा आत्मा हा अविद्राव्य न तुटणारा आहे त्याला तोडणे त्याला सुकवणे किंवा जाऴणे कदापि शक्य नाही. हा नेहमी टिकणारा सर्वव्यापी, अपरिवर्तनीय व निश्चल व नित्य आहे.
सर्वगत : हा यातील शब्द फार महत्वाचा आहे. भगवंताच्या सर्व सृष्टित जीवात्मे आहेत हि नि:संशय आहे.ते पाण्यात आहेत, हवेत ही आहेत व भूमीवर आहेत वृक्षवेलींवर आहेत व अग्नितही आहेत.
अशी जागाच नाही जीथे जीवात्मे नाहीत.
सुईच्या अग्रावर राहणारे व दुर्बीणीद्वारे दिसणारे व न दिसणारे लाखो जंतू हे सजीवच आहेत व हत्तीप्रमाणे उंच धिप्पाड दिसणारे हे देखील सजीवच आहेत.
आत्मा ही एक ऊर्जा आहे ती निर्माण करता येत नाही किंवा नष्ट करता येत नाही ती एका ऊर्जेतुन दुसर्या ऊर्जेत परावर्तीत करता येते. (पुनर्जन्म ही संकल्पना अशाप्रकारची आहे)
अनेकदा पेपर मधुन ही पुनर्जन्मातील स्मृतिमुऴे खुनी सापडले वगैरे घटना ऐकल्या व वाचल्या आहेत. (सर्वांनाच गतजन्माची स्मृती नसते)
देह जरी नष्ट झाला तरी वासना नष्ट होत नाही.आपुलकी स्नेहभाव नष्ट होत नाहीत.
शास्त्रकारांनी आई वडिल जीवंत असताना सेवा कराच त्यांचा आदर करा हे सांगीतले आहेच याच सोबत त्यांचा पश्चात त्यांचा गती करता श्राध्द ही सांगीतले आहे.
तेव्हा ऋषींच्या वचनावर व भगवद्गीतेवर विश्वास ठेवुन पितरांचे स्मरण करु व त्यांचे आशीर्वाद प्राप्त करु.
वरील माहितीत चुक असेल तर क्षमस्व
वे.शा.सम्पन्न प्रदीप महाराज कलगावकर वसमतकर् साइ बाबा मन्दिर् पुज्यारि सुन्दर वादि कम्ब्रिज् चौक् जालना रोद् चिकलथाना छ्त्रपति सम्भाजिनगर् ९८८१२९५६४१
(वरील लेख लेखकाच्या नावागावा सहीत अन्य समुहावर देउ शकता याने तात्विक समाधान लाभेल व चौर्यकर्म पातक लागणार नाही)
सहायक :- फास्ट न्यूज़ ग्रुप
टिप्पणी पोस्ट करा